जम्मू - जम्मूतील टाडा (दहशतवादी आणि विघटनकारी कारवाया अधिनियम) न्यायालयाने सोमवारी जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (जेकेएलएफ) नेता यासीन मलिक आणि इतरांविरोधात १९९० मध्ये भारतीय वायुदलाच्या चार अधिकाऱ्यांची हत्या केल्याप्रकरणी आरोप निश्चित केले.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जम्मूच्या टाडा न्यायालयाने यासीन मलिक आणि इतरांविरोधात भादंवि कलम ३०२, ३०७, टाडा कायदा १९८७ आणि शस्त्र कायदा १९५९ सह इतर कलमांतर्गत आरोप निश्चित केले. केंद्रीय गुन्हे अन्वेषण संस्था अर्थात सीबीआयला ३० मार्चपर्यंत या प्रकरणात साक्षीदार सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. हे प्रकरण गेल्या ३० वर्षांपासून आरोप निश्चित करण्याच्या तर्कावर प्रलंबित आहे. न्यायालयाने यासिन मलिक, अली मोहंमद मीर, मंजूर अहमद सोफी तथा मुस्तफा, जावेद अहमद मीर तथा नालका, नानाजी तथा सलीम, जावेद अहमद जर्गर आणि शौकत अहमद बख्शी यांच्याविरोधात आरोप निश्चित केले अाहेत. जेकेएलएफचा यासीन मलिक जम्मू-काश्मिरातील फुटीरतावादी नेता म्हणून आणि पाकिस्तानचा समर्थक म्हणून सर्वत्र ओळखला जातो.
मृत्युदंड देण्याची कुटुंबीयांची मागणी
स्क्वाॅड्रन लीडर रवी खन्ना यांची विधवा पत्नी शालिनी खन्ना तथा निर्मल खन्ना यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, त्यांना न्याय मिळायला हवा आणि यासीन मलिकला मृत्युदंड व्हायला हवा. त्यांनी सांगितले की, यासीन मलिकने केवळ माझ्याच पतीची हत्या केली नाही तर माझी सासू, सासरे आणि माझ्या आईचीही हत्या केली आहे. माझ्या दोन मुलांचे बालपण हरवले आहे. काही क्षणात माझा आनंद हिरावला गेला. या दहशतवाद्याने आमचे जग उद्ध्वस्त केले. यासीन मलिक आणि इतर सर्व आरोपींचा स्क्वाॅड्रन लीडर रवी खन्ना अाणि वायुदलाच्या तीन जवानांच्या हत्येत सहभाग होता. पुरेसे पुरावे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.