अयाेध्या/लखनऊ : अयोध्या जन्मभूमीमध्ये विराजमान श्री रामलल्ला २५ मार्चला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर २८ वर्षे जुन्या तंबूचा त्याग करून संगमरवरी चबूतऱ्यावर उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या मंदिरात विराजमान होणार आहे. यानिमित्त श्री रामलल्लांचा विशेष अभिषेक आणि पूजन होणार आहे. रामनवमीनिमित्त देशभरातून सुमरे १० लाख भाविक येथे येण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाने ३१ मार्च ते २ एप्रिलपर्यंत रामलल्लांच्या दर्शनाच्या अवधीत दोन तासांची वाढ केली आहे. तथापि, कोरोना व्हायरसच्या धोक्याकडे बघता रामनवमीवर अयोध्येत भक्तांची गर्दी कशी आटोक्यात ठेवता येईल, याबाबत प्रशासन आणि सरकार चिंतेत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी संकेत दिले आहेत की, रामनवमी पर्वाचे थेट प्रसारणही केले जाऊ शकते. यामुळे लोकांना घरबसल्याच रामलल्लांचे दर्शन आणि सोहळाही पाहता येईल.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या ४ महिने १५ दिवसांनंतर अयोध्येत आयोजित या सोहळ्यात तात्पुरत्या मंदिराजवळ मुख्यमंत्री पारिजातक, रुद्राक्ष व तुळशीची रोपटी लावणार आहेत. रामनवमीला २८ वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेचे पालन करत प्रशासनाने रामलल्लांच्या दर्शनासाठी ३१ मार्चपासून २ एप्रिलपर्यंतच्या ३ दिवसांसाठी २ तासांची वेळ वाढवून दिली आहे. इतर दिवसांसाठी भाविक सकाळी ७ ते ११ आणि दुपारी १ वाजेपासून ५ वाजेपर्यंतच दर्शन करू शकतात. अयोध्येचे एडीएम जे.पी. सिंह म्हणाले की, आरोग्य आणि सुरक्षेच्या कारणांमुळे अवधी वाढवणे शक्य नाही. २५ मार्चला पहाटे ३ वाजता रामलल्ला, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न व हनुमानासोबत नव्या तात्पुरत्या मंदिरात हलवले जाईल. भाविक येथे रामलल्लांचे दर्शन ५२ फुटांऐवजी १५ फुटांवरून करू शकतील. मंदिरला आकर्षक बनवण्यासाठी वाटिकेजवळ शेकडो रोपटी लावली आहेत. आरतीनंतर मुख्यमंत्री मंदिर उभारण्यासाठी आर्थिक मदतीची घोषणा करणार आहेत.