नवी दिल्ली/भोपाळ : मध्य प्रदेशातील घडामोडीवर सर्वाेच्च न्यायालयात बुधवारी ४ तास सुनावणी झाली. भाजपने तत्काळ बहुमत चाचणी घेण्याची व काँग्रेसच्या बंडखोर आमदारांची सुटका करण्याच्या मागणीवरून काँग्रेस, भाजप, राज्यपाल, विधानसभाध्यक्ष आणि बंडखोर आमदारांच्या वतीने ५ वकिलांनी युक्तिवाद केला. काँग्रेसने सांगितले, बंडखोर आमदारांनी राजीनामे देण्यामागे भाजपचा कट आहे. याची चौकशी व्हावी. काँग्रेसने आमदारांच्या राजीनाम्यानंतर रिक्त जागांवर पोटनिवडणुका होईपर्यंत बहुमत चाचणी घेऊ नये, अशीही मागणी केली. भाजपने यास विरोध दर्शवला. भाजपच्या वतीने मुकुल रोहतगी यांनी सांगितले, आम्ही १६ आमदारांची न्यायालयात ओळख परेड करू शकतो. हा प्रस्ताव फेटाळत न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या पीठाने म्हटले, की १६ बंडखोर आमदार बहुमत चाचणीस येवोत अथवा ना येवोत, परंतु त्यांना बंदिस्त ठेवता येणार नाही. दरम्यान, गुरुवारी यावर पुन्हा सुनावणी होईल. इकडे काँग्रेस नेते दिग्विजयसिंह बुधवारी बंडखोरांचे मन वळवण्यासाठी बंगळुरूत आले. परंतु कर्नाटक पोलिसांनी त्यांना हॉटेलबाहेरच रोखले.
कोर्टाचा निर्णय / 16 बंडखोर आमदारांना बंदिस्त ठेवता येणार नाही : सुप्रीम कोर्ट